त्या रस्त्याने पुन्हा नाही- भयकथा

मी किशोर. मी आपल्या बरोबर एक भयान आणि अंगावर काटा येणारा अनुभव शेअर करतोय. ही घटना पुण्यामध्ये ४ वर्षा पूर्वी मी कॉलेजला शिकत असताना कुणाल, मी आणि रवी आमच्या तिघांसोबत घडली. आम्ही तिघे एकमेकांचे चांगले मित्र होते. आम्ही कॉलेजमध्ये क्लासमध्ये एकमेकांसोबत ग्राउंड वर एकमेकांसोबत कुठेही जायचं म्हटलं तरी सोबत असायचो. अभ्यास करायचा म्हटलं तरीही आमच्या तिघांचा ग्रुप असायचा.

आम्ही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना फायनल पेपरच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर मी, रवी आणि कुणाल असे आम्ही तिघं मित्र रूमवर बसून अभ्यास करत होतो. एके दिवशी रात्री अकरा वाजता मला चहा आणि सिगारेटची इच्छा झाली.
“रवी, कुणाल बास झाला अभ्यास. चला एक एक सिगारेट घेऊ आणि बाहेरून फिरून घेऊयात.” मी म्हणालो.
“अरे वाजलेत किती बघतोयस ना? आणि आत्ता सिगरेट प्यायला जायचं शक्यच नाही. मी तर नाही येणार.” कुणाल म्हणाला.
“आर चल की लगेच जाऊन येऊ. आत्ता कुठे अकरा वाजलेत.” मी म्हणालो.
“नको लका.” कुणाल म्हणाला.
“अरे चल येऊ जाऊन थोडे पाय पण मोकळे करू.” रवी म्हणाला.
आम्ही कॉलेजला गेल्यापासून या दोन वर्षात कधी रात्रीचे बाहेर पडलो नव्हतो. पण आज सिगारेटच्या निमित्ताने पहिल्यांदाच रात्रीचे रूम सोडून बाहेर जात होतो.

पुण्यातील ठराविक दुकाने 24 तास चालू असतात हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आमच्या रूम पासून एक दीड किलोमीटर अंतरावर असेच एक दुकान आहे जे 24 तास चालू असते. आम्ही रूम मधून बाहेर आलो आणि रस्त्याला लागलो. गल्लीतल्या रस्त्याकडे पाहिले तर सगळीकडे एकदम निरव शांतता होती. सगळीकडे शुकशुकाट होता. कोणीही बाहेर दिसत नव्हते. फक्त रात किड्यांचा किर्रर्र… असा आवाज येत होता. आणि मंद वाऱ्याची झुळूक येत होती. आम्ही तिघेही विचारात पडलो की “आत्ता कुठे अकरा वाजले आहेत तोपर्यंत आपल्या गल्लीत एवढी शांतता कशी काय? आम्ही कधी याचे या आधी पण एवढे निरीक्षण केले नाही.”

आम्ही एकमेकांशी गप्पा मारत तिघेही तिकडे रस्त्याने चालत निघालो. आम्ही ज्या गल्लीतून रस्त्याने चाललो होतो त्याच गल्लीत पुढे गेल्यानंतर मध्येच एक पूर्वीचा खूप जुना वाडा आहे. त्या दिवशी त्या वाड्याकडे पाहिल्यानंतर जरा विचित्रच वाटत होतं. आणि त्या वाड्याच्या जवळ गेल्यावर वातावरणात पण जरा गारवा निर्माण झाल्यासारखं जाणवल. पण मी तिकडे जास्त लक्ष न देता सरळ पुढे दुकानाकडे निघून गेलो.

दहा मिनिटात आम्ही दुकानावरती पोहोचलो. तिघांनीही एक एक सिगारेट आणि चहा घेतला. दहा मिनिट तिथेच थांबलो. आणि दहा मिनिटानंतर तिथून गप्पा मारत रूम कडे निघालो. त्या वाड्या जवळून आम्ही तिघं जण मस्ती करून येत होतो. वाड्या जवळून पुढे आल्यानंतर मला वाटल कि कोणीतरी स्त्री मागून चालून येत आहे. मी वळून मागे बघितल तर मला एक ब्राह्मण समाजाची स्त्री दिसली. मी तिला बघितल आणि पुढे चालत निघालो.
“इथून बस स्टॅन्ड किती लांब आहे” त्या बाईने आम्हाला विचारले.
आम्ही गप्पा मारत चाललो होतो पण त्या बाईने मला काहीतरी विचारल्या सारखं वाटलं म्हणून आम्ही पाठीमागे वळलो आणि काय म्हणून विचारले.
“मी म्हणाले इथून बस स्टॅन्ड किती लांब आहे” त्या बाईने पुन्हा आम्हाला विचारले.
आम्ही तिला पत्ता सांगितला आणि पुढे बघून रूम कडे चालू लागलो.
“टाईम काय झाला आहे आत्ता” त्या बाईने नंतर आम्हाला विचारले.
“आत्ता साडेअकरा वाजत आले आहेत.” मी त्या बाईला सांगितले
थोडे पुढे गेल्यानंतर त्या बाईने पुन्हा मला पत्ता विचारला. नंतर दोन मिनिटांनी टाईम विचारला. असे ती सारखेच विचारू लागली

ती आम्हाला सारखेच विचारत होती म्हणून आम्ही चिडलो होतो आम्ही माघारी पाहून तिला रागवणार होतो. पण माघारी पाहिले तर मागे कोणीच नव्हत. आम्ही तिघांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. मी रवी आणि कुणाला म्हटलं जाऊ देत गेली असेल कुठे चला आपण निघूयात. परत थोडा पुढे गेलो तेव्हा परत पाठीमागून त्या बाईचा तसाच आवाज आला. “मला कोणीतरी थोडी मदत करता का ?”

मी आणि माझ्या मित्रांनी पलटून बघितल तर १ ब्राह्मण समाजाची बाई त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत होती. मुख्य म्हणजे या वेळी तिचे डोके उलटे होते. पूर्णपणे पाठीमागे तोंड फिरले होते. तिचे सगळे केस विस्कटलेले होते. डोळ्यांची बुबळे पांढरी शुभ्र झाली होती. आणि तिचे दोन्ही हात तिच्याच गळ्यामध्ये घट्ट पकडलेले होते.
“रवी कुणाल पळा…” मी मोठ्याने ओरडलो.
आम्ही तिच्या कडे बघितल आणि घाबरून धूम ठोकून पळत सुटलो, ते थेट रूमवर जाऊन थांबलो. पाठीमागे वळून पण बघितलं नाही. रूम मध्ये गेलो तेव्हा रूमची लाईट बंद होती. आम्ही लाईट लावली. आणि तिघे एका जागी शांत बसलो. आम्ही तिघेही खूप घाबरलो होतो. त्या रात्री झोप तर पण चांगली लागली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही आजू बाजूच्या जुन्या लोकांना रात्री झालेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला. आणि त्यांना त्या वाड्याचा जुना इतिहास विचारला.
तर त्यावेळी एका आजोबांनी सांगितल की, “तो वाडा ब्राह्मण समाजाच्या एका सावकाराचा आहे.”
“ब्राह्मण सावकाराचा म्हणजे ? आणि तिथे आता कोणीच का राहत नाही.” आम्ही त्यांना विचारले.

“तो वाडा ज्ञानेश काका नावाच्या एका ब्राह्मणाचा आहे तो काळ फार पूर्वीचा जुना आहे. त्यावेळी आम्ही पण लहान होतो. ते काका या गल्लीतल्या आणि आजूबाजूच्या लोकांची सावकारकी करत होते. जरी ते सावकार असले तरी ते कोणालाच अजिबात त्रास देत नव्हते. ते खूप समजदार होते. अडल्या नडलेल्या ला वेळोवेळी मदत करत होते. त्यांना एक मुलगी होती. ती एकुलती होती त्यामुळे त्यांनी तिला खूप लाडात वाढवले होते. त्या मुलीचे आणि याच गल्लीतल्या एका मुलाचे एकमेकांवरती प्रेम होते. पण तो मुलगा पर जातीचा असल्यामुळे त्यांना ते मान्य नव्हते. त्यांनी तिचे लग्न ब्राह्मण समाजाचे एका मुलाबरोबर जमवले लग्न काही दिवसांवरती आले होते. पण तिचा प्रियकर एके दिवशी रात्रीचा लपून त्यांच्या वाड्यात गेला. आणि त्याने तिचा जीव घेतला. तो मुलगा दोन दिवसात सापडला. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर ते काका पण इथून निघून गेले. ते कुठे गेले ते कुणालाच माहीत नाही. त्यानंतर काही वर्षांनी तो मुलगा सुटून घरी आला. त्या मुलीने एका अमावास्येच्या रात्री त्याचाही जीव घेतला. नंतर येथील एका बिल्डरने जेसीबी ने तो वाडा पाडण्याचा प्रयत्न केला पण वाड्याचा एक दगड खूप जोरात जेसीबी वरती पडला त्यामुळे त्याने ही तो वाडा पाडायचा परत प्रयत्न केला नाही. त्यानंतर ती बऱ्याच जणांना येथे दिसली आहे. त्यामुळे तेव्हापासून त्या वाड्यामध्ये कोण जात पण नाही आणि त्याच्या समोरही कोणी थांबत नाही. आणि लोक म्हणतात की त्या दोघांचे आत्मे अजूनही या वाड्यात आहेत. रात्री नऊ दहा वाजल्याच्या नंतर तर या गल्लीतुन जायला सुद्धा लोक घाबरतात.” आजोबांनी आम्हाला सांगितले.

त्या दिवसापासून मी सिगारेट सोडून दिली. आणि आम्ही त्या रस्त्यानी नंतर कधी गेलोच नाही. आणि नंतर पण कधी जाणार नाही.

लेखककिरण सांगळे

इतर कथा

एक स्वप्न असंही- भयकथा

दगडी भिंत- भयकथा

रात्रीचा शापित प्रवास- भयकथा

शेतातील घर (भाग १)- भयकथा

Leave a Comment