शेतातील घर (भाग २)- भयकथा

आजोबा आम्हाला खुप ओरडले तरीही मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारले. मी त्यांना जेव्हा चार – पाच वेळा विचारलं तेव्हा कुठे त्यांनी मला हा सगळा प्रकार सांगितला…
ती स्त्री कोण होती. तिच्या सोबत नक्की काय घडले ते आजोबा सांगू लागले…

अरे काय सांगू पोरा तुला, तुझा काका काकी त्यांच्या कामामुळे गावाकडे येत नाहीत. कुठे चार – दोन दिवस येतात. आणि लगेच शहराकडे निघतात. आणि तुम्ही पण दोन वर्षांपूर्वी तुझ्या शाळेसाठी इथून निघून गेलात तुझा बाबा तरी शेतातले सकाळ संध्याकाळ एवढं तेवढ काम बघत होता. पण तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी इथून शहरातल्या शाळेत बदली करून घेतली. त्यामुळं आम्ही दोघं म्हातारा म्हातारी गावाकड एकट पडलो. घरी दोन गुर, चार शेळ्या असल्यामुळे म्हातारीला पण घर सोडता येत नव्हत. वया मानाने मला एकट्या म्हाताऱ्याला सगळं काम पणं होईना. शरीर आता पहिल्या सारखं काम देईना पोरा.

भिताडासारख्या झालेल्या मोठ्या उसात पाणी लावायला जायच म्हटलं तर जीव दबकायचा, कारण आत मध्ये पाय गुंतुन, घसरून पडलो दुखापत झाली तर या म्हातार्‍याला बघायचं तरी कोण हाय इथं ? आणि दवाखान्यात तरी कोण न्यायचं. म्हणून तुझ्या बाबानी पाटलाच्या शेतावर काम करणाऱ्या मधुला त्याच्या गावी आपल्या शेतातलं काम करायला एखादं जोडपं हाय का बघायला सांगितलं.

मधूने एक जोडपं बघितलं आणि आठ दिवसात त्याला इकडे बोलून घेतलं. त्यावेळी तुझ्या बाबांना पण इकडे बोलून घेतलं आणि आम्ही दोघांनी त्यांना सगळं काम समजावून सांगितलं. त्याचवेळी रानात हा गोठा आणि एक खोली त्यांना राहायला बांधून दिली. मग मी जनावरे पण तिथे नेऊन बांधली आणि रानातल्या कामासोबत जनावरांच काम पण त्यांच्यावरती सोपवलं.

दोघे ही रानातल्या कामाला लागले. रघु सगळी कामे चोख बजाऊ लागला. पण रघु कधीकधी दारू पीत होता व दारू पिऊन दंगा ही करायचा. त्यामुळे त्याच्यावर माझा विश्वास नव्हता. पण रघु ची बायको शालिनीवर माझा विश्वास होता. शालिनी खुरपणीचं काम जनावरांचा चारा व इतर कामे वेळेच्या वेळी करत होती. तिचा स्वभाव पण चांगला होता. कधी कधी आम्हाला भेटायला पण ती घरी येत होती. दोघेही खूप कष्टाळू होते. सगळ सुरळीत चालू लागलं होत. त्यामुळे मला थोडा आराम मिळायला लागला. आराम मिळाला खरा पण तो काय जास्त दिवस टिकला नाही.

गावातील दोन-तीन दारुड्यांच्या संबंधाने रघु चा दारूचा नाद हळूहळू जरा जास्तच वाढू लागला. त्यामुळे रघुची आणि शालिनीची भांडणं पण दिवसेंदिवस जरा जास्तच व्हायला लागली होती. दारूचे नादापायी त्याने काही दिवसातच त्याचा जीव गमावला.

“म्हणजे” मी आजोबांना म्हणालो.

त्या दिवशी संध्याकाळी तो दारू प्यायला गावाकडे गेला. गावातील दारुड्यांनी त्याला खूप दारू पाजली. दारू पिऊन तो घराकडे निघाला तेव्हा रस्ता पार करताना त्याला एका ट्रकने उडवले. गावातील गावकरी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण त्याचा जीव काही वाचला नाही. मी गावातील गावकऱ्यांच्या मदतीने दवाखान्याच्या रुग्णवाहिका गाडीबरोबर रघुच प्रेत आणि तिला त्यांच्या गावाकडे पाठवून दिलं तिकडेच त्याचं अंत्यसंस्कार झाले.

शालिनी महिन्याभरातच परत माघारी इकडे आली.
आम्ही तिला विचारलं “काही गं पोरी इकडे कशी काय आली तू?”
“काय सांगु आजोबा तुम्हाला नवरा दारू पाय गेला. माझी पोरं आणि मी उघड्यावरती पडलो. सासू – सासऱ्यांचं वय झाले आता. त्यांना पण काही काम होत नाही. एक मुलगा एक मुलगी आहे. ते पणं शाळेत जातात. त्यांना तरी माझ्याशिवाय कोण आहे आता” शालिनी म्हणाली.
“आगं पण तू इकडे कशी काय?” म्हातारी तिला म्हणाली.
“आजी आग कामासाठी आलेय आमच्या गावाकडे काय काम भेटत नाही म्हणून इकडे आले.” शालिनी म्हणाली.
ती पुन्हा कामावर ठेवण्यासाठी आम्हाला विनवणी करू लागली.
“बरं… बरं… ठीक आहे पण तू एकटी रानातल्या घरी रात्रीची काय थांबत जाऊ नकोस. दिवस मावळतीला गेला की घरी ये. इथेच स्वयंपाक कर. इथेच झोपत जा. आणि माझी सायकल घेऊन शेतावर जात जा.” मी तिला म्हणालो.
“ठीक आहे.” शालिनी म्हणाली.

ती पुन्हा नव्याने कामावरती जाऊ लागली. तिला सायकल चालवता येत होती. त्यामुळे ती सकाळी सायकलवर शेतावर जायची आणि संध्याकाळी परत घरी यायची. आता तिच्यावरती कामाला ताण पण जरा जास्तच होता. उसाचे पाणी देणे, खुरपणी करणे व इतर कामे ती एकटीच करत होती. आणि आता ती तिच्या गावाकडे पण जास्त जात नव्हती. इथूनच पैसे पण पाठवून द्यायची. ती शेतातल्या कामासोबत घरातील घर कामाला सुद्धा म्हातारीला मदत करत होती. त्यामुळे आपल्या घरातील एक चांगली सदस्य बनत गेली. पण ती जास्त दिवस आपल्या घरात सदस्य म्हणून राहू शकली नाही.

“का असं काय झालं तिला.” तेवढ्यात मी आजोबांना म्हणलो.

ऊसाला पाणी देण्यासाठी जर कधी रात्रपाळी असेल तर शालिनी रात्रभर उसाला पाणी देत त्या खोलीतच झोपायची. हे गावातील दोन तीन उनाड पोरांना समजले होते. तेव्हापासून ते तिच्या पाळतीवर होते. असे म्हटले तरी काही हरकत नाही. मी एक दोन वेळा त्यांना शब्दांचा मार दिला होता. तरीही त्यांना काहीच फरक पडत नव्हता. त्यातच त्यांनी एक दिवशी त्यांचा डाव साधला. आणि त्यातच शालिनीने तिचा जीव गमावला.

त्या दिवशी ती दिवसभर जरा निवांतच होती. दिवसभर तिला दुसरं काही काम पण नव्हतं. कारण त्या दिवशी रात पाळीची लाईट होती.‌ त्यामुळे तिने तिचा पुर्ण दिवस घरकाम करत आमच्या सोबतच घालवला. आणि संध्याकाळी जेवण करून ती आम्हाला म्हणाली की “मी उसाला पाणी द्यायला जाते आणि पहाटेची माघारी येते” मी तिला नको म्हणत होतो तरीही तिने काही ऐकलं नाही आणि ती शेताकडे गेली. ते दोघंही तिच्या मागावरती शेताकडे गेले. आणि तिला त्या नराधमांनी हेरले.

ती ऊसावरती पाणी चालू करून ज्यावेळी त्या खोलीत येऊन झोपली. त्यावेळी ते दोघे नराधम तिच्या पाठोपाठ त्या खोलीमध्ये शिरले. आणि त्या दोघांनी तिच्यावरती बलात्कार केला. ती त्यावेळी किंचाळली तिने आरडाओरडा केला. पण ती त्यांच्यापासून तिची सुटका करू शकली नाही. आणि त्यानंतर त्या दोघांनी तिचा जीव घेतला.

पहाटेपासून आम्ही तिची घराकडे येण्ऊ वाट पाहत होतो. सकाळ झाली तरी ती अजून कशी आली नाही. म्हणून मी तिला पहायला शेताकडे गेलो. तर त्या खोलीमध्ये तिचा मृतदेह निपचित पडला होता. तिच्या अंगावरची साडी फाटली होती. अंगावर नखाचे ओरबाडे दिसत होते. मी ते सगळं माझ्या शेजारच्या रानात काम करणार एका पोराला कळवलं. थोड्याच वेळात हे सगळं गावभर कळालं. गावातील बरीच मंडळी तेथे जमा झाली. हा प्रकार पाहून गाव सगळं सुन्न झालं होतं. गावात फक्त एकच चर्चा चालू होती हे कोणी केलं कसं झालं.

गावातील पाटलांनी ते पोलिसांना कळवले. पोलिस मृतदेह हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले व त्यांनी तपास सुरू केला. त्याच दिवशी ते दोघं गावातून असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांचा संशय त्यांच्यावरती संशय आला. आणि संध्याकाळी ते दोघंही पोलिसांना सापडले. त्यांनी त्या सगळ्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली. आणि तो मृतदेह रुग्णवाहिकेमधून तिच्या गावाकडे पाठवून दिला.

त्या दिवसापासून तेथे तिचे किंचाळलेले, पैंजणांचे आवाज, वाचवा वाचवा मला वाचवा, असे आवाज येऊ लागले आपल्या शेताच्या शेजारचे लोक म्हणतात की ती बाई अमावस्याच्या दिवशी गोठ्याजवळ व शेतात फिरताना दिसते. तेव्हापासून आम्ही कोणीही दिवस मावळतीला गेल्यानंतर त्या रानात फिरकतही नाही.

मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा.

धन्यवाद…

” लेखक- किरण सांगळे “

इतर कथा

Leave a Comment