
केदार आणि राहुल दोघे गावात निघाले होते. तेवढ्यात सुरज चा केदार ला फोन आला.
*अरे चल ना रूमवर जाऊ उद्या आपली इंटरनल आहे. जरा स्टडी केला असता इंटरनल चा” सुरज.
“अरे आज नको जायला उद्या संध्याकाळी जाऊया” केदार.
“मूर्ख आहेस का तू उद्या आपली इंटरनल आहे. आणि तू म्हणतोय उद्या संध्याकाळी रूमवर जाऊ” सुरज.
“अरे आज आणि उद्या आपल्या गावची वर्षाची कार्तिकी पौर्णिमेची यात्रा आहे आणि तू यात्रा सोडून कॉलेजला जायचं म्हणतोस नाही. मी तर नाही येणार” कुणाल.
“राहुल कुठे आहे. तो काय म्हणतोय” सुरज.
“तो माझ्यासोबत आहे. आज संध्याकाळी आपल्या गावामध्ये कोल्हापूरचा खूप मोठा तमाशा येणार आहे. त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे. ते पाहायला आणि गावात फेरफटका मारायला आम्ही दोघे गावाकडे चाललो आहे” कुणाल.
“फोन त्याच्याकडे दे” सुरज.
“हा बोल” राहुल
“राहुल कुणाल काय म्हणतोय उद्या इंटरनल ला जायचं नाही. अरे वेडे झाले का तुम्ही. सर ओरडतील आपल्याला” सुरज.
“अरे नाही काय होत. थोडे ओरडतील पण जाऊ देत. आणि तसंही याच्या अगोदर पण एकदा आपली इंटरनल बुडवली होतीस की तेव्हा तरी कुठे काय बोलले. आपली यात्रा तशी वर्षातून एकदाच असते. आणि त्यामध्ये संध्याकाळी गाजलेला तमाशा येणार आहे. तो तमाशा बघायला जायचे आहे.” राहुल.
“बरं ठीक आहे” सुरज.
“तू येतोय का गावाकडे आत्ता” राहुल.
“नाही मी नाही येत आता संध्याकाळी आपण तिघेही सोबत जाऊया मग” सुरज.
“ठीक आहे ठेवतो आता संध्याकाळी कॉल करतो तुला,” केदार.
संध्याकाळी आठ वाजता केदार आणि राहुलची भेट होते.
“अरे चल ना जाऊया आठ वाजलेत. तमाशा चालू होईल आता.” केदार.
” सुरज नाही आला अजून. येतोय ना तो.” राहुल.
“हो मला येतो म्हणाला आहे. एक मिनिट थांब त्याला फोन करतो मी” केदार.
“हॅलो अरे कुठे आहेस तू? येतोय ना तमाशाला” केदार.
“हो.. येणार आहे. दहा मिनिट थांब आलोच” सुरज.
दहा-पंधरा मिनिटात सुरज केदार आणि राहुल जवळ चालत आला.
“हे काय तू चालत आलाय आणि तुझी गाडी कुठे आहे.” राहुल
“अरे माझी गाडी पंचर झाली आहे. तू घे ना तुझी गाडी” सुरज.
“आमची गाडी तर आई-बाबा गावाकडे देवाला घेऊन गेलेत” राहुल.
“मग केदारची गाडी आहे ना” सुरज
“तुला माहित आहे ना माझ्या गाडीची अवस्था काय आहे. ती कधी कुठे बंद पडेल त्याचा पत्ताही लागणार नाही. आणि तिचे लाईट ही लागत नाही” केदार
“मग आता जायचं कसं, डोंगराला वळसा घालून पाच किलोमीटर जायचं का आता” राहुल.
सगळे चिंताग्रस्त होऊन खाली बसले तेवढ्यात,
“जंगलाच्या वाटेने मधून जाऊयात गावच्या वेशीवरच्या त्या दगडाच्या भिंतीवरून उतरून” सुरज.
“वेडे झाले आहेत का तुम्ही. त्या दगडाच्या भिंतीवरून पडून एका बाईने आपला जिव गमावला आहे. आणि त्या दिवसापासून ती बाई तिथे दिसते. असे गावातील लोक म्हणतात तुला माहीत नाही का? आणि घरच्यांना माहित झाले तर ओरडतील आपल्याला. तरीही तू तिथून जायचं म्हणतोय.” राहुल.
“आपण पाहिले आहे का त्या बाईला?” सुरज.
“पण गावातील लोक काय खोटं बोलतात का? कशाला विषाची परीक्षा घ्यायचीय.” राहुल.
एक मिनिट थांबा… भांडण करू नका. केदार मोठ्या आवाजात बोलतो.
“चला जाऊ यात आपण जंगलाचे वाटेने दहा-पंधरा मिनिटात तर गावामध्ये पोहोचू. बघू काय होईल ते होईल. मी बॅटरी घेऊन आलो दोन मिनिट थांबा” केदार.
केदार बॅटरी घेऊन आला आणि तिघेही चंद्राच्या प्रकाशात हातात बॅटरी घेऊन जंगलातील पाऊल वाटेने निघाले. जंगलामध्ये कुठे त्यांना चित्पाखरूही दिसत नव्हते. पण रातकिड्यांच्या आवाजाने मात्र धुमाकूळ घातला होता. तिघेही थोडे घाबरलेले होते. थोड्याच वेळात ते वेशीवरच्या भिंतीपाशी पोहोचले. दोन मिनिट थांबुन त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. आणि तिघेही एकदम शांत झाले.
“अरे एक मिनिट थांबा आवाज करू नका कोणीतरी रडल्याचा तडफडल्याचा आवाज येत आहे तुम्हाला जाणवत आहे का?” सुरज.
“हो रे आवाज येतोय” केदार
“ही नक्की तीच बाई असणार. चला पटकन निघा इथे थांबायला नको” राहुल
तिघेही दगडाच्या भिंतीवरून खाली उतरून गावाकडे गेले. दोन अडीच वाजेपर्यंत त्यांनी तमाशा पाहिला. आणि तमाशा संपल्यावर ते पुन्हा त्याच रस्त्याने घराकडे निघाले.
“मला जरा जास्त भीती वाटते काही होणार तर नाही ना आपल्याला” सुरज.
“काही नाही होत रे कशाला घाबरतोयस, चल जसे आलो तसे पटकन जाऊयात” केदार.
तिघेही चालत चालत भिंतीपाशी आले. एक एक करून दगडाच्या भिंतीवरून वरती चढू लागले. राहुल आणि केदार भिंत चढून वरती गेले. आणि सुरज भिंतीवर चढताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला.
तेवढ्यात पाठीमागून एका बाईचा आवाज आला.
“अरे नीट चढ पाय घसरून खाली पडलास, लागलं का? मी पण असेच पडले होते”
सुरज पाठीमागे बघ तुझ्या मागे एक बाई आहे. केदार आणि राहुल जोरात ओरडले. आणि दोघेही भिऊन तिथून पळत सुटले.
सुरज च्या पायाला थोडे लागलं होतं, त्याला उठता येत नव्हते. पण तरीही त्याने त्याच्या अंगातील पूर्ण बळ एक करून उठून उभा राहिला. आणि पाठीमागे पाहिले तर डोक्यावरती पदर घेऊन एक बाई त्याच्या पाठीमागे उभा होती. तिची साडी फाटलेली होती. तिच्या डोक्यातून भळाभळा चेहऱ्यावरती रक्त येत होतं सगळा चेहरा रक्ताने माखलेला होता. हात रक्ताने माखलेले होते. त्याच्या एकदम चेहऱ्याच्या जवळ ती बाई उभा होती. तो खूप घाबरला होता. त्याचं डोकं सुन्न झालं होतं. पहाटेच्या थंड वातावरणात सुद्धा त्याला घाम फुटला होता. तो कसलाही विचार न करता गावाच्या दिशेने पुढे सुटला. पण तो भटकला होता. तो कुठे चाललाय हे त्यालाच कळत नव्हते. ना त्याला पुढे गाव दिसत होते ना कसला रस्ता. तो फक्त पळत होता.
इकडे केदार आणि राहुल पुढे जाऊन थांबले आणि एकमेकांना बोलू लागले.
“राहुल अरे त्याला ते बाईने काय केलं असेल तर” केदार.
“मला ही खूप भीती वाटते रे पण आपण जाऊन पाहायचं का नक्की काय झालं” राहुल.
“बरं… चल जाऊयात” केदार ( थोडे थांबून बोलला).
ते दोघे त्याच रस्त्याने माघारी आले आणि त्या दगडाच्या भिंतीवरून खाली उतरून जंगलाच्या दिशेने बॅटरी फिरवत त्याला शोधू लागले. त्या दोघांनाही सुरजचा मागमूस ही लागत नव्हता. ते शोधत शोधत जंगलाचे थोडं आत मध्ये गेले असता त्यांना बॅटरीच्या प्रकाशात त्याच दगडी भिंतीच्या बाजूला एका झाडाखाली सुरज तडफडताना दिसला. आणि त्याच्या शेजारी ती बाई एक मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात मारायच्या तयारीत उभी होती. बॅटरीचा प्रकाश तिच्या कडे केला तर तिला चेहराच नव्हता. आणि तिच्या आजूबाजूला सगळीकडे पाण्यासारखं रक्त पसरलेलं होतं. ते दोघं सुरज च्या नावाने मोठ्याने ओरडले, पण त्याचा काहीच फायदा नव्हता, कारण त्यांचा आवाज तिथे जाईपर्यंत तिने तो दगड त्याच्या डोक्यात घातला होता. ते दोघेही ते दृश्य पाहताच तिथून जोरात पळ सुटले. आणि थांबले ते घरी येऊनच. त्यांनी घडलेला सगळा प्रकार घरच्यांना आणि वस्तीवरील लोकांना सांगितला. सकाळपर्यंत वस्तीवरील लोकांपासून गावापर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
दिवस उजाडताच गावातील आणि वस्तीवरील काही लोक जंगलाची दिशेने आली. आणि जंगलात सुरज ला शोधायला लागली. थोड्या वेळात जंगलाच्या मध्य वर त्याच झाडाखाली सुरज बेशुद्ध अवस्थेत निश्चित पडलेला दिसला. त्यांनी तिथून त्याला उचलले आणि थेट गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्या जंगलातील वाटेने जाण्याची त्यांची कधीच हिम्मत झाली नाही.
समाप्त…
” लेखक- किरण सांगळे “