अनोळखी रस्ता- भयकथा

नमस्कार मित्रांनो ही घटना माझ्यासोबत गेल्या सीझनला म्हणजेच दीड वर्षांपूर्वी घडलेली आहे. त्यावेळी नुकताच उसाचा कारखाना चालू झाला होता. ट्रॅक्टर वर माझ्या गावातील एक होतकरू नवीन मुलगा ड्रायव्हर म्हणून ठेवला. मग मी माझी बाकीची कामं आणि ऊसतोड कामगारांवर लक्ष देऊ लागलो. सगळे ऊसतोड कामगार कामाला लागले. सगळं सुरळीत चालू झालं होतं. पण दहा – पंधरा दिवसातच ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर काही कारणास्तव काम सोडून गावी निघून गेला. दुसरा ड्रायव्हर मिळत नसल्यामुळे मी स्वतःच माझ्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बनलो.

ऊस तोडीच्या धंद्यात मी पण नवीनच उतरलो होतो. त्यामुळे मी आजूबाजुच्या बाकीच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर सोबत ओळख करून घेतली. कारण कारखान्यावरती येता जाताना त्यांच्या शिवाय दुसरं कोणीच माझ्यासाठी सोबतीचं नव्हतं. मी त्यांच्या सोबतच कारखान्यावर ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागलो. पण महिन्याभरातच माझ्यासोबत अशी घटना घडली. ज्या घटनेची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. त्या घटनेने मला हादरवून सोडले.

त्या दिवशी पहाटेच मी खेप खाली करून कारखान्यावरून माघारी निघालो होतो. तेव्हा तिथेच ट्रॅक्टरचा टायर पंचर झाला. त्यामुळे माझ्यासोबत चे बाकीचे ट्रॅक्टर सगळे पुढे निघून आले. आणि मी सकाळ होईपर्यंत तिथेच थांबलो. सकाळी आठ वाजता दुकाने उघडली. मग मी ट्रेलर रस्त्याच्या बाजूला सोडून ट्रॅक्टर पंक्चरच्या गॅरेजला घेऊन गेलो. पंचर काढला. पण पंचर काढून टायर मध्ये पाणी भरेपर्यंत मला तिथेच दोन – अडीच वाजले. ट्रेलर ट्रॅक्टर ला जोडल्या. तेथील स्थायिक ट्रॅक्टर ड्रायव्हरांनी मला जुन्या रस्त्याबद्दल सांगितलं. तो रस्ता थोडा अरुंद आणि खराब होता होता पण त्या रस्त्याच अंतर सात ते आठ किलोमीटर कमी होतं. मग मी त्याच रस्त्याने तिथून निघालो. ट्रॅक्टर पंचर झाल्यामुळे सकाळ पासून जेवण पण केले नव्हते. त्यामुळे जातानाच एका हॉटेलमध्ये थोडा नाश्ता करून घेतला.

मी ट्रॅक्टर घेऊन माघारी फडात आलो. तरी ऊसतोड कामगारांनी दोन टेलरच्या भरतीचा माल केला नव्हता. त्यामुळे माझे डोके फिरल. माझं आणि कामगारांच थोड भांडण झालं. मी तिथेच थांबून त्यांच्याकडून भरतीचा ऊस तोडून घेतला. दोन्ही ट्रेलरची भरती केली. ट्रॅक्टर बाहेर काढून ऊस बागायतदाराकडून डबा घेतला. आणि कारखान्याकडे निघालो. भरतीचा माल न झाल्यामुळे आणि भांडण झाल्यामुळे मला फडातच खूप उशीर झाला होता. माझा ट्रॅक्टर बाहेर निघेपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते. तोपर्यंत बाकीचे सगळे ट्रॅक्टर पुढे निघून गेले होते. आता मला एकट्यालाच जावं लागणार होतं. मी ट्रॅक्टर घेऊन रस्त्याला लागलो. जाताना विचार केला की सकाळी ज्या रस्त्याने आलो होतो. त्याच जुन्या रस्त्याने मधूनच कारखान्यावरती जाऊयात. कारण त्या रस्त्याच्या अंतर कमी होते त्यामुळे कारखान्यावरती तरी दुसऱ्या ट्रॅक्टरची सोबत होईल.

कारखान्यावरील अंतर लवकर कमी करण्याच्या नादात मी मुख्य रस्ता सोडून तो जुना रस्ता पकडला. त्या दिवशी अमावस्येची रात्र होती. त्या रस्त्याला लागल्यावर मला थोडी चिंता येऊ लागली. तेव्हाच मनात काहीतरी विचित्र भावना दाटून आली होती. रस्ता एका छोट्याशा डोंगराळ भागातून जात होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त झाडेच झाडे होती, जणू काही त्या रस्त्याने मानववस्तीचं अस्तित्व कधी अनुभवलं नव्हतं. रस्त्याने साधी एक मोटरसायकल पण कुठे दिसत नव्हती. माझ्यासोबत पण कोणी नव्हते. रात्रीची वेळ होती. अमावस्येची रात्र असल्यामुळे काळोखाने सगळीकडे आक्रमण करून ठेवले होते. कोठे रस्त्याने एक बल्बचा पण उजेड नव्हता. डोळ्यावरती झोप पण खूप होती. पण आता रस्त्याला लागलो होतो. भरतीचा ट्रॅक्टर घेऊन माघारी पण फिरता येत नव्हते. आणि कोठे थांबता पण येत नव्हते. माझा मी स्वतः थोडा धीर देत मन घट्ट केले. साऊंड चा आवाज कमी करून मोजकाच ठेवला. आणि कसलाही विचार न करता ट्रॅक्टरच्या दोन डोळ्यांच्या मोजक्या प्रकाशात लक्ष केंद्रित करून पुढे रस्ता शोधत ट्रॅक्टर चालवू लागलो.

थोडं पुढे गेल्यानंतर एकदम अचानकच खूप थंडी वाजू लागली. अंगात हुडहुडीच भरली. आणि अचानक रस्त्याने थोड वळण घेतलं. जसं ट्रॅक्टरने वळणं घेतलं तसं थोडं पुढे गेल्यावर ट्रॅक्टरच्या उजव्या बाजूला मला एखादी व्यक्ती सावली सारखी उभी असल्याचं जाणवलं. मनात आलं की ही भीतीमुळे माझी समजूत असेल. मी थोडं दुर्लक्ष केलं आणि ट्रॅक्टर पुढे नेऊ लागलो. पण काही वेळातच माझ्या ट्रॅक्टरच्या साईड मिररमध्ये मला तीच सावली सतत दिसू लागली. जणू काही ती सावली माझ्या मागून चालत होती. मी ट्रॅक्टर थांबवुन साइड मिरर पुसुन स्वच्छ केला आणि मागे पाहिलं. तर मागे काहीच नव्हतं! मी पुन्हा ट्रॅक्टर सुरू केला, पण आता अंगात येणारी थंडी आणि झोप अधिक वाढू लागली होती. वाटलं की ट्रॅक्टर थोडा वेळ थांबवून झोप काढावी, पण त्या विचित्र रस्त्यामुळे मन काही धजावत नव्हतं.

मी पुढे जात होतो तेवढ्यात ट्रॅक्टरच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात रस्त्याच्या मधोमध एक स्त्री आणि तिच्या बाजूला एक लहान मुलगा उभा असलेला दिसला. त्यांची आकृती अगदी काळ्या सावलीसारखी होती, चेहरा अस्पष्ट, हात लांबसर, आणि डोळे चमकदार होते. तिच्या सोबतचा लहान मुलगा जोरजोरात हसत होता. ते दृश्य पाहून माझ्या शरीराने जणू गोठल्यासारखं वाटलं. मी ब्रेक मारून ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टर चे स्पीड जास्त असल्यामुळे ट्रॅक्टर त्यांच्यावरून पुढे निघून गेला. नंतर मी ट्रॅक्टर न थांबवता ट्रॅक्टरचे स्पीड वाढवले. आणि तेवढ्यात बाजूला पाहिले. तर माझ्या साईटच्या सीट वरती ती स्त्री आणि मुलगा बसलेले होते. त्यांना बाजूला पाहून माझा थरकाप उडाला, शरीर थरथरू लागलं. मी कसाबसा ट्रॅक्टर थांबवला. आणि आजूबाजूला अंधाऱ्या काळोखात सैरावैरा पळू लागलो. हे सगळं काही क्षणातच माझ्यासोबत घडलं. मी काय करतोय, कुठे पळतोय. मला काहीच समजत नव्हत. थोड्या वेळात मी एका जागी थांबलो. मी खूप घाबरलो होतो. माझ्या आजूबाजूला काळोख आणि झाडेझुडपे यांच्या शिवाय मला दुसरे काहीच दिसत नव्हते. मला पुन्हा ती स्त्री आणि मुलगा माझ्या समोरून चालत जाताना दिसले. त्यांना पाहून मी तिथूनच ट्रॅक्टरच्या दिशेने पळालो. एवढ्या थंडीच्या दिवसात सुद्धा मी घामाने पूर्ण भिजलो होतो. मी ट्रॅक्टर जवळ आलो आणि तिथेच रस्त्यावरती चक्कर आली. आणि मी तिथेच खाली कोसळलो.

काही वेळाने कारखान्यावरून खाली होऊन त्याच रस्त्याने एक ट्रॅक्टर माझ्याजवळ आला. त्या ट्रॅक्टर वरील ड्रायव्हरने मला ट्रॅक्टरच्या समोर पडलेलं पाहून त्याचा ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला लावला. आणि पळतच माझ्याकडे आला. त्याने मला उठवण्याचा प्रयत्न केला. पण मी काही शुद्धीवर आलो नाही. दोन मिनिटांनी तो उठला. आणि ट्रॅक्टर मध्ये पाण्याची बॉटल आहे का पाहायला गेला. ट्रॅक्टर जवळ गेल्यावर त्याचे लक्ष ट्रॅक्टरच्या सीट वरती गेले. तो खूप जोराने ओरडला. आणि तो तेथेच ट्रॅक्टरच्या बाजूला खाली कोसळला.

दुसऱ्या दिवशी सकाळी एका व्यक्तीने आम्हाला उठवलं. मला जाणीव झाली की त्या रात्री घडलेल्या गोष्टी काही साध्यासुध्या नव्हत्या. काही ठिकाणं ही नुसती रस्त्यापुरती नसतात; ती काहीतरी भयावह रहस्य लपवून बसलेली असतात. आणि त्याच दिवशी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत अनोळखी आणि भयावह वाटणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करायचा नाही.

समाप्त…

” लेखक- किरण सांगळे “

इतर कथा

Leave a Comment